अहमदनगर : आत्महत्या केलेले अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीचे शेतकरी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरूच आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आर्थिक मदत केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेही या कुटुंबाच्या मदतीसाठी धावल्या आहेत. या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे छोटीशी मदत ५१ हजार रुपये प्रत्येक मुलाच्या नावे आणि ५१ हजार पत्नीच्या नावे देत असल्याचं यांनी जाहीर केलं.

पंकजा मुंडे त्यांच्या पोस्टमधून म्हणाल्या, ‘माझ्या मावशीचे पती यांचे निधन झाले असल्याने मी यावर पूर्वी टिप्पणी नाही केली पण बातमी पाहिली.. प्रशांत मल्हारी बटुळे या मुलाने “नको करू आत्महत्या बळीराजा” ही हृदयद्रावक कविता शाळेत गायली आणि 2 तासात त्याच्या पित्याने आत्महत्या केली. मन सुन्न झाले ..

कविता ऐकूनही ही दुर्दैवी घटना टळली असती तर बरं झालं असतं.!

या चिमुकल्याची कविता इतर शेतकरी बांधवांना अशा चुकीच्या विचारांपासून परावृत्त करो व मल्हारी बटुळे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!!

भारजवाडी या गावी मी या कुटुंबाला लवकरच भेट देणार आहे . लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेबांवर अपार प्रेम करणाऱ्या पाथर्डी परीसरातील या दुर्दैवी परीवाराला मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे छोटीशी मदत रु. 51 हजार प्रत्येक मुलाच्या नावे आणि रु. 51 हजार पत्नीच्या नावे देत आहे …’

प्रशासकीय स्तरावर मदतीच्या हालचाली

तहसीलदार नामदेव पाटील यांनी बटुळे कुटुंबाने कोणत्या बँकेकडून कर्ज घेतले याची माहिती घेतली असता, मल्हारी बटुळे यांच्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज घेतले असल्याचे समजले. पाटील यांनी ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवली असून या विषयावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत बटुळे कुटुंबाला काय मदत करता येईल याचा निर्णय घेतला जाणार आहे, तर आळंदी येथील अशोक देशमाने यांनी मल्हारी कुटुंबाशी संबंधित असलेले देवीदास खेडकर यांच्याशी संपर्क साधत मल्हारी बटुळे यांच्या दोन्हीही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

मुलाने शाळेत कविता सादर केली, दोन तासात वडिलांची आत्महत्या

मातृभाषा दिनानिमित्त तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मल्हारी बटुळे यांचा तिसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा प्रशांत याने शेतकरी आत्महत्या या विषयावर स्वरचित कविता सादर केली होती. या कवितेत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असा संदेश प्रशांत याने दिला होता. मात्र, त्याच दिवशी रात्री व्यथित झालेल्या मल्हारी बटुळे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने भारजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here