हायलाइट्स:
- सोशल मीडियावर Single_Vote_BJP ट्रेन्डिंगवर
- डी कार्तिक भाजपचे स्थानिक पदाधिकारी
- भाजपच्या युवा विंगचे जिल्हा उपाध्यक्षाला केवळ एक मत
तामिळनाडूतील कोयंबतूर जिल्ह्यातील पेरयानायकनपालयम मतदारसंघाच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये, ही अजब परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपप्रणित अपक्ष उमेदवार डी कार्तिक यांना या निवडणुकीत केवळ एक मत मिळालंय. उल्लेखनीय म्हणजे, कार्तिक यांच्या स्वत:च्या कुटुंबात पाच मतदार आहेत. तसंच डी कार्तिक हे भाजपच्या युवा विंगचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. हा धक्कादायक निकाल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
‘स्थानिक पालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराला केवळ एक मत मिळालंय. मला त्यांच्या घरातील इतर चार मतदात्यांचा अभिमान वाटतोय ज्यांनी इतर उमेदवारांना मत देण्याचा निर्णय घेतला’, असं ट्विट लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मीना कंडासामी यांनी केलंय.
या निकालानंतर डी कार्तिक यांनाही जबर धक्का बसलाय. ‘मी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली नव्हती. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो. माझ्या कुटुंबाकडे चार मतं आहेत. ही सगळी मतं ४ क्रमांकाच्या वॉर्डात येतात (कार्तिक यांनी ९ व्या वॉर्डात निवडणूक लढली). भाजपच्या तिकीटावर लढल्याचा आणि मला माझ्या कुटुंबाचंही मत न मिळाल्याचा चुकीचा प्रचार सोशल मीडियावर केला जातोय’ असं स्पष्टीकरण डी कार्तिक यांनी दिलंय.
तामिळनाडूच्या नऊ नवनिर्मित जिल्ह्यांतील स्थानिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. नऊ जिल्ह्यांत २३,९९८ पदांसाठी एकूण ७९,४३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैंकीच एक डी कार्तिक आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times