हायलाइट्स:
- शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
- आता फडणवीसांनी केला पलटवार
- लखीमपूर घटनेवरील आरोपांनाही दिलं उत्तर
‘पवारसाहेब ४ वेळा मुख्यमंत्री राहिले, पण फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो. ते मोठे नेते आहेत, पण कधीच सलग पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरंच झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. मात्र ते कधी दीड वर्ष, कधी दोन वर्ष असे चार वेळा मुख्यमंत्री राहिले,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर पलटवार केला.
लखीमपूर घटनेवरून केलेल्या टीकेलाही दिलं उत्तर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह अन्य काही व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपने मावळ इथं शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची आठवण करून दिली. मात्र मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, असं पवार यांनी म्हटलं. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जालियनवाला बाग इथं झालेल्या प्रकरणातही पोलिसांनीच हत्या केली होती, मात्र त्यांना आदेश वरून देण्यात आले होते. तसंच मावळच्या घटनेतही पोलिसांना आदेश देण्यात आले होते,’ असा घणाघात फडणवीस यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेली चौकशी ही हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरू असून यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचं स्पष्टीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times