म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज, मंग‌ळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात होणार असून, पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल ७० टक्क्यांपर्यत घसरल्याने यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले असून, ८० गुण लेखी परीक्षेसाठी; तर २० गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नप्रत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणे राहणार असून, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. राज्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होईल. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेत ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा राज्यातून ११० तृतीयपंथी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ४९७९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यापैकी ८० संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

वेळापत्रकामध्ये बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आलेला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले; तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती http://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

भरारी पथकांसह विशेष महिला पथके

एकूण २७३ भरारी पथकांसोबतच बैठे पथक आणि विशेष महिला भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा कक्षात अर्धा तास अगोदर उपस्थित असणे आवश्यक आहे. एका वर्गात २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत. हे पाकीट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन व त्यानंतर स्वत:ची स्वाक्षरी घेऊन उघडतील, असे डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.

मुंबई विभागातील विद्यार्थी संख्या

यंदा मुंबई विभागातून तीन लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यात दोन लाख १२ हजार ५२४ विद्यार्थी आणि एक लाख ७९ हजार ४४७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर २० ट्रान्सजेंडर ही परीक्षा देणार आहेत. यात दोन हजार ७५९ दिव्यांग्य विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी विभागात १०२४ परीक्षा मुख्य केंद्रे असून ३७८५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

हातमोजे घालून परीक्षा

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा पलन सिदार्थ जया या विद्यार्थ्याला हाताला घाम येत असल्यामुळे त्याने शिक्षण मंडळाकडे हातमोजे घालून परीक्षा देण्यास मुभा मागितली. यानुसार मंडळाने त्याला पांढरे हातमोजे घालून परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. याबाबत केंद्र प्रमुखांनी विशेष काळजी घ्यावी अशी सूचना दिल्याचे विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here