म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने प्रभाग अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत. मुंबईच्या ज्या प्रभागामध्ये तसेच, वस्त्यांमध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहे. प्रभाग अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षेमध्ये हे निर्देश देऊ शकतात, असेही त्यांना सूचित करण्यात आले आहे.

‘मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करोना संसर्गामुळे बाधितांची संख्या किती आहे याची माहिती ठेवली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बाधितांची संख्या किती आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी योग्यवेळी लसीकरण करून घ्यावे यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे. ज्या शहरांमध्ये लसीकरणाचा वेग अधिक आहे त्यात मुंबईची नोंद झालेली आहे. मात्र आता हा वेग वाढवण्याची गरज आहे. तिसरी लाट आता येण्याची शक्यता कमी झाली असली तरीही पालिकेने कोणत्याही प्रकारे गाफील राहायचे नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

झोपडपट्ट्यांवर अधिक लक्ष

झोपडपट्ट्यामध्ये तसेच, चाळींमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही येथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मोठ्या इमारतींच्या तुलनेमध्ये या भागांत अधिक समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे यापूर्वी झालेल्या सीरो सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरणासंदर्भात जे काही गैरसमज असतील ते दूर व्हायला हवेत. यासाठी सामान्यांचे समुपदेशन करणे, त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत येण्यातील अडचणी कोणत्या आहे हे समजून घेण्यात येणार आहे. तिसरी लाट आली तरीही लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यानंतर संसर्गाची तीव्रताही कमी होईल. त्यामुळे झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये संसर्ग कमी आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. पाटील यांनी लक्ष वेधले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here