वॉशिंग्टन: कॅनडाचे अभिनेते विल्यिम शॅटनर यांनी ९० व्या वर्षी अंतराळात प्रवास केला. अंतराळात प्रवास करणारे शॅटनर हे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. उद्योजक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनचे न्यू शेफर्ड रॉकेटचे दुसरे उड्डाणही यशस्वी ठरले. या अंतराळ प्रवासात विल्यिम यांच्यासह चार जणांचा सहभाग होता. ९० व्या वर्षी विल्यिम यांच्याशिवाय ब्लू ओरिजिनचे ऑड्रे पावर्स, फ्रेंच कंपनी डॅसो सिस्टिमचे ग्लेन डे रीस आणि अर्थ ऑब्जरव्हेशन कंपनीचे सह-संस्थापक ख्रिस बोशुईजेन यांनीदेखील अंतराळात प्रवास केला.
अंतराळ पर्यटक पृथ्वीपासून ३,५१, १८६ फूट उंचावर शून्य गुरुत्वाकर्षणात तीन मिनिटे होते आणि अंतराळातील वातावरणाचा अनुभव घेतला. NS18 रॉकेटने भारतीय वेळेनुसार, रात्री ८.२० वाजता उड्डाण घेतले. या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण ब्लू ओरिजनच्या संकेतस्थळावर करण्यात आले.
हा प्रवास फक्त १० मिनिटे १७ सेकंदाचा होता. ब्लू ओरिजनच्या अंतराळ प्रवासाच्या तिकिट दराची माहिती अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. कॅनडाचे अभिनेते विल्यिम शॅटनर यांनी साठच्या दशकात प्रसिद्ध टीव्ही मालिका स्टार ट्रॅकमध्ये कॅप्टन जेम्स टी कर्क यांची भूमिका केली होती.
अॅमेझॉनचे संस्थापक आणि उद्योजक जेफ बेझोस यांनी आपल्या ब्लू ओरिजनच्या पहिल्या अंतराळ उड्डाणात सहभाग घेतला होता. त्यांनी २० जुलै रोजी उड्डाण घेतले होते. या पहिल्या अंतराळ पर्यटन उड्डाणात जेफ बेझोस यांचा भाऊ मार्क बेझोस, ८२ वर्षीय नासाच्या वॉली फंक आणि लिलावात अंतराळ पर्यटनाची तिकिट खरेदी करणारे १८ वर्षीय डच विद्यार्थी ओलिव्हर डॅमेन यांचा समावेश होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times