हायलाइट्स:
- दीपक रामचंद्र मानकरी यांचं अल्पशा आजाराने निधन
- पवार कुटुंबाचे निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते म्हणून होती ओळख
- हरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची सर्वत्र भावना
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्यावर प्रचंड निष्ठा असणारे दीपक मानकर हे मोठे मंडप व्यवसायिक होते. पक्ष आणि पक्षप्रमुखांवर असलेली निष्ठा आणि कार्यतत्परता, संघटन कौशल्य यामुळे दीपक मानकर यांना पुणे जिल्हा सेवादल व महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली.
दीपक मानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते शाहरुख या नावाने ओळखत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मानकर यांना शाहरुख याच नावाने हाक मारत असत. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात कोठेही सभा असूद्या त्या ठिकाणी दीपक मानकर हे सभा ठिकाणी दोन्ही पवारांच्या मागे उभे राहत असे.
मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना पक्षाने मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात स्वतंत्र केबिन आणि एक वाहन देखील दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांची लोणावळ्यातील सिद्धार्थनगर येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times