हायलाइट्स:
- जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर
- अर्ज भरण्यास गुरुवारपासून प्रारंभ होणार
- ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचणार
जिल्हा बँकेसाठी मतदान दिवाळीनंतर २१ नोव्हेंबरला होणार आहे, तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचं आणि नेतेमंडळींचं लक्ष लागलं होते. अशातच मतदार यादीबाबत अन्य जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांनी याचिका दाखल केल्यामुळे त्याचा परिणाम होणार काय? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नसल्यामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, बँकेच्या २१ जणांच्या संचालकांसाठी ही पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा बँकेत निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times