विजयादशमीच्या निमित्ताने संघ कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले की, आजही देशाच्या विभाजनाची वेदना आमच्या मनातून संपलेली नाही. आपल्याला त्या दुःखद इतिहासाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशाचे विभाजन झाले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणूनच हरवलेल्यांना परत स्वीकारण्यासाठी आपल्याला जुना इतिहास माहित असणे आवश्यक आहे. परंतु अशा अखंडतेची पहिली अट म्हणजे भेदभाव आणि समानता नसलेला समाज. या उणिवांमुळे काही रानटी परदेशी आले आणि आम्हाला पदच्युत करून निघून गेले. आमच्या कमतरतेमुळे हे घडले आहे. ‘
संघाच्या नागपूर महानगरचा विजयादशमी उत्सव रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात दोनशे स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी बोलताना सरसंघचालक म्हणाले,’लोकसंख्येचे असंतुलन समस्या ठरत आहे. पूर्वोत्तर राज्यामध्ये धार्मिक आधारावरील असंतुलित लोकसंख्येमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार या सीमावर्ती राज्यांतील मुस्लिम लोकसंख्येची वृद्धी सरासरीपेक्षा अधिक आहे. याचा फायदा घेत बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) आवश्यकता आहे. संघाने याबाबत रांची येथे २०१५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित केला आहे. काही विद्वानांनीदेखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे समर्थन केले आहे. केंद्राने एनआरसी अंतर्गत घुसखोरांना नागरिकता आणि जमीन खरेदीच्या अधिकारापासून वंचित करायला हवे.’
देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलताना भागवत म्हणाले,’सागरी टापुंसह सर्व सीमा अधिक मजबूत करायला हव्यात. कलम ३७० रद्द केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, तेथील नागरिकांमध्ये ते भारताचे अंग आहेत ही भावना निर्माण करण्याची गरज आहे. टार्गेट व्हायलन्सद्वारे दहशतवादी स्वतःची भीती पुनः स्थापित करण्याचे प्रयत्न करत आहेत. ते सरकारने हाणून पडायला हवेत.’ तत्पूर्वी, ध्वजारोहण, शारीरिक कवायती झाल्या. प्रास्ताविक महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे, इस्रायलचे कौन्सिलेट जनरल कोब्बी शोशनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांची उपस्थिती होती.
मंदिरे सरकारच्या ताब्यात नकोत
देशभरातील काही मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. काही भाविकांच्या अधीन आहेत. परंतु, काही ठिकाणी हिंदूंची मंदिरे हडपण्याचे प्रकार दिसून येत आहेत. हिंदू धर्माविरुद्ध कार्य करण्याची स्थळे बनली आहेत. तेव्हा सर्व मंदिरे ही भाविकांच्या ताब्यात असायला हवी. त्याचे व्यवस्थापन भाविकांनी करायला हवे, असे भागवत म्हणाले.
ड्रग्स, ओटीटी आणि शत्रू देश
अमली पदार्थाचे देशांत होणारी अवैध आयात, त्यातून सर्व स्तरातील लोकांमध्ये वाढलेले व्यसन यावर कुणाचेही नियंत्रण नाही. यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पैसा जात असून शत्रू देश याला प्रोत्साहन देत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्ममधून दाखविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता सरसंघचालकांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times