मुंबई: राज्यात २०१९ या एका वर्षात कर्करोगाचे तब्बल ११ हजार ३०६ रुग्ण आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत मुद्दा उपस्थित केला होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार डावखरे यांनी प्रश्न मांडला. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तपशीलवार माहिती दिली.

टोपे म्हणाले, ‘राज्यात २०१९ मध्ये ५ हजार ७२७ रुग्णांचा कर्करोगाने मृत्यू झाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांत महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध केली आहे. रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारीपर्यंत ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’

होप ऑफ लाइफ संस्थेने राज्यात तीन हजार रुग्णांमागे एक तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे म्हटले होते, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले असता मंत्री टोपे यांनी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. मात्र, होप ऑफ लाइफने राज्यात असंसर्गजन्य आजाराबाबात अभ्यास केला नसल्याचे स्पष्ट केले.

‘राज्यातील ११ जिल्ह्यांतील केमोथेरपी केंद्रातील फिजीशियन व स्टाफ नर्स यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे एक महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत १६ जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून, २०२०-२१ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांतील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे,’ असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here