मुंबई: दहावीचा पेपर फुटलाच नाही, असा दावा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पेपरफुटीबाबत विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटल्याचा () प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे घडल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअॅपवर व्हायरल झाली होती. कुऱ्हाकाकोडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती होती. हे वृत्त राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी मात्र फेटाळले आहे.

पेपरफुटी झाली नसल्याचा अहवाल

जळगाव जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र क्र. ३३५१, कुऱ्हाकाकोडा (ता. मुक्ताईनगर) येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिद्धल झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवालही मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी तातडीने सखोल चौकशी करून अहवालही सादर केला. त्यात संबंधित परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद करण्यात आले असून प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहनही प्रा. गायकवाड यांनी केले. माध्यमांनी परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत असे आवाहनही प्रा. गायकवाड यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here