Iskcon Temple Vandalised In Bangladesh: बांगलादेशमध्ये धर्मांधांचा उच्छाद; इस्कॉन मंदिरावर हल्ला, एका भाविकाची हत्या – iskcon temple vandalised in bangladesh one devotee dead body found
ढाका: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदू मंदिर, धार्मिक स्थळांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही धर्मांधांचे हल्ले सुरूच आहेत. हिंदू मंदिर, दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले केल्यानंतर धर्मांधांच्या झुंडीने नौखाली येथील एका इस्कॉन मंदिरावरही हल्ला केला. इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची हत्या करण्यात आली. इस्कॉन मंदिराजवळील तलावात त्यांचा मृतदेह आढळला.
इस्कॉनने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. इस्कॉनने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इस्कॉनने केली आहे.
इस्कॉनचे राधारमण दास यांनी ट्विट करून म्हटले की, पार्थ दास हे बेपत्ता होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांची क्रूरपणे हत्या केली असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, नवरात्रैत्सवात कथित इशनिंदेच्या मुद्यावरून बांगलादेशात हिंदू मंदिरांवर काही समाजकटकांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये तीन जण मारले गेले असून, २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारात ६० जण जखमी झाले आहेत. तर, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times