हायलाइट्स:
- पडदा पडल्यानंतरही ‘दशरत’ उठलाच नाही!
- कलाकार राजेंद्र सिंह यांचा मंचावरच मृत्यू
- प्रेक्षकांनी आणि सहकारांनी व्यक्त केली हळहळ
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिह्यातील हसनपूर गावात सुरु असलेल्या ‘रामलीला’ सादरीकरणा दरम्यान घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय.
या रामलीलेत कलाकार राजेंद्र सिंह दशरथ राजाच्या भूमिकेत मंचावर हजर झाले होते. राम वनवासाकडे निघाल्याचं दृश्यं कलाकारांनी मंचावरून सादर केलं. राम वियोगात दशरथ राजाने आपले प्राण सोडल्याचं दृश्य सादर झालं आणि त्यानंतर मंचावरचा पडदाही पडला. परंतु, दशरथाची भूमिका निभावणारे राजेंद्र सिंह काही उठले नाही.
हे पाहून राजेंद्र सिंह यांना उठवण्यासाठी त्यांचे साथी कलाकार धावले. परंतु, राजेंद्र सिंह यांचा श्वासोच्छवास थांबल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ‘दशरथ राजा’च्या भूमिकेत दिसणाऱ्या राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर परिसरावरही शोककळा पसरली.
गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून रामलीलेच्या संचात राजेंद्र सिंह राजा दशरथाची भूमिका निभावत आपला उदरनिर्वाह करत होते. प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवण्याची त्यांच्यात होती, अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बिजनौरच्या हसनपूर गावात गेल्या २ ऑक्टोबरपासून रामलीला सादरीकरण सुरू करण्यात आलं होतं. १४ ऑक्टोबर रोजी राम वनगमनाच्या दृश्यांचं सादरीकरण होतं. याच दरम्यान ही घटना घडल्याचं समजतंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times