हायलाइट्स:
- मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या पवारांना पंकजा मुंडेंचं चोख प्रत्युत्तर
- पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर…
- ‘सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधण्यापेक्षा विरोधी पक्षाचं काम करा’
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न केला असता मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्या एवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं पवारांनी म्हटलं होतं. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिल्लीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीसाठी जात असताना विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता ‘त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होणार नाही’ अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ‘मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही पण मोबाईलवर पाहिलं. त्यांनी जे बोललं ते खरं आहे. मी मोठा नेता नाही. मी लहानच आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तरीही त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर त्यामुळे मी लहानही होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच राहणार. ते आमच्या पेक्षा मोठे नेते आहेत. यात काही वादच नाही’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर…
एका जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विरोधकांनी आता सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधण्याआधी विरोधकांच्या भूमिकेत काम करायला हवं असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान या विषयी सखोल विचारलं असता ‘सरकार पाडण्यासाठी जोर दिला आणि याबद्दल कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं तर जनतेच्या कामासाठी त्यांच्याकडे उर्जाच राहणार नाही. सरकार किंवा विरोधी पक्ष हा जनतेसाठी काम करत असतो. त्यामुळे सरकार राहतं की जातं हा विषय महत्त्वाचा नसून आपलं काम महत्त्वाचं आहे’ असा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times