हायलाइट्स:
- सर्वपक्षीय पॅनलमधून काँग्रेसचा काढता पाय
- आता भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला
- खडसे विरुद्ध खडसे सामना रंगण्याची शक्यता
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आज रविवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘आम्हाला गाफिल ठेवून इतरांची खलबते’
‘जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे. असं असताना आम्हाला गाफील ठेऊन इतर पक्षांची खलबते सुरू होती,’ असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला. भाजप स्वबळावर लढणार असून उद्या सर्वच्या सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सुरुवातीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आग्रही भूमिका घेतली. सर्वपक्षीय पॅनलसाठी दोन ते तीन बैठका सकारात्मक झाल्या. जागा वाटपाचे सूत्र ठरले. मात्र, आता आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या सूचना असल्याचं सांगितलं. शेवटच्या क्षणी असं करायचंच होतं तर आम्हाला सुरुवातीलाच सांगायला हवं होतं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
‘हे तर काँग्रेसचे सोयीचे राजकारण’
गिरीश महाजन म्हणाले की, ‘काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या बैठकांना हजेरी लावली. पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून वेगळी भूमिका घेतली. हा प्रकार म्हणजे, काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते’, अशी टीका महाजन यांनी केली. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो. मात्र, तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचंही महाजन म्हणाले. इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. ते उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. ते सक्षम असतील तर त्यांच्या उमेदवारीचा भाजप नक्की विचार करेल, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.
‘…तर नणंद-भावजयीत लढत’
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यादेखील जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याच्या सूचना असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. रक्षा खडसे यांना भाजपकडून महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची लढत नणंद अॅड. रोहिणी खडसेंसोबत होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times