Sangli News : ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही. अजित दादांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही माझ्या बाबतीत सांगितले ते खरंच आहे, याची कबुली जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्सा सांगितला. 2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हंटले. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. याशिवाय त्यावेळी माझ्या खाजगी सचिवाला त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं माझं मत तयार झालं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सांगली जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पोलीस स्टेशन हे लोकांच्या मदतीला असतात, त्यामुळे या वास्तूची भीती वाटायला नको. लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास वाटेल, असं वातावरण आपल्याला तयार करायला हवं. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलीस दल काम करत आहे. मोठ्या धाडसाने चोरी झालेला मुद्देमाल आमच्या पोलीस बांधवांनी परत मिळवून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे, असे म्हणत जयंत पाटील सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.
राज्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज नकोत : जयंत पाटील
पोलिसांना अधिकार वाढवून देणं गरजेचं आहे. आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते. गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्याची आम्ही चौकशी करतो. त्यामुळे आपण पोलिसांना जेवढे अधिक संरक्षण देऊ, तेवढंच अधिक धाडसानं पोलीस रस्त्यावर उतरतील. अनेकवेळा राज्यकर्त्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांबद्दल गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांला बदला अशी भूमिका घेतात. गैरसमज झाला असेल पण लगेच त्या अधिकाऱ्यांची बदली करणं हा काय त्यावर उपाय नसतो. खरंच जर त्या अधिकाऱ्यांकडून चूक झाली असेल तर त्या अधिकाऱ्याला चूक सुधारण्याची संधी ही राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
पोलिसांच्या सदृढतेकडे लक्ष आणि त्यांना थोड्या आरामाचीही गरज : जयंत पाटील
गृहमंत्री झाले की, लगेच जर ब्लड प्रेशर वाढत असेल, डायबिटीसचा त्रास सुरु होत असेल राज्यकर्त्यांबरोबरच पोलिसांना देखील याचा धोका जास्त आहे. पोलीस देखील आज किती तणावाखाली जगत असतील, याचा विचार केला पाहिजे. पोलीस बांधवांना मिळेल ती ड्यूटी करावी लागते, रात्री अपरात्री गस्त घालावी लागते, अनेकांना झोप मिळत नसते. त्यामुळे पोलीस बांधवांना मोठा स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी आपण उपक्रम राबवायला हवे. मला खात्री आहे याबाबतही प्रशासन नक्की विचार करेल. पोलिसांच्या सदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा थोडा आराम देण्यासह त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असं मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.