संगमनेर: कोणत्याही तरुण जोडप्याला लाजवेल अशी ज्येष्ठांची लव्हस्टोरी सध्या ‘अग बाई सासूबाई’ या मालिकेत दाखवण्यात येत आहे. रुपेरी पडद्यावरील ही घटना मात्र नाशिकमध्ये सत्यातही उतरली आहे. ८० वर्षाचे नवरदेव निवृत्ती रुपवते आणि ६८ वयाच्या आजीबाईंचा अनोखा विवाह सोहळा नुकताच जिल्हातील सिन्नर येथील हिवरे या गावी पार पडलाय. ऊर्वरीत आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याऐवजी या जोडप्याने लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. या विवाह प्रसंगी शेकडो वऱ्हाडींनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.

ज्येष्ठांच्या या विवाहसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेवरील वाक्ये वर्तमानाची जाण करून देणारी होती. पत्रिकेवर लिहल होत ‘|| भवतु सब्ब मंगलम्।।, आम्ही ज्येष्ठ नागरिक आमच्या जीवनाच्या सायंकाळी परस्परांना आधार देण्यासाठी आणि भविष्यकालीन जीवन समृध्द करण्यासाठी परस्परांचे स्वप्न, प्रेरणा आणि इच्छापुर्ततेसाठी उभयतांच्या संमतीने विवाहबध्द होत आहोत. तथागत भगवान गौतम बुध्द आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद सोबत घेऊनच या अनोख्या नाविन्यपुर्ण जीवनात आम्ही समस्त समाज बांधवांच्या शुभेच्छा आणि समाजमान्यता मिळविण्यासाठी विवाहबद्ध होत आहोत.’ अशी या वयात लग्न करण्यामागची भूमिका मांडली होती. त्याशिवाय या आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेत नमन, प्रज्ञा, शिल, करुणा… ‘संयोजक-संयोजकाचा चतुर खेळ… पूर्वपुण्याईचा घातला मेळ’ आणि कार्यवाहक म्हणून- ‘कार्यवाहका शक्ति देई …मंगल कार्य तडीस नेई….’ अशा वाक्यांची पखरण करण्यात आली होती. त्यामुळे ही निमंत्रण पत्रिका वाचनीय ठरली होती.

नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यात हिवरे या गावी बुद्धविहारात ज्येष्ठांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. पोस्ट मास्टर म्हणुन निवृत्त झालेले ८० वर्षाचे निवृत्ती रुपवते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ६८ वर्षाच्या सुमनबाई पवार यांच्याशी विवाह केला. दोघांनी आयुष्याच्या सायंकाळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या सहमतीने हा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. रुपवते यांना एक मुलगा आहे. मात्र दहा वर्षांपासून तो बेपत्ता आहे, तर सुमनबाई यांना दोन मुली आहेत. उतार वयात दोघेही एकटे असल्याने ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली आणि १६ फेब्रुवारीला हा लग्नसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा जुळवून आणण्यात सुमनबाई यांचे पुतणे चंद्रकांत पवार यांनी महत्वाची भुमिका बजावली.

या लग्न सोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली तर नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या. उतार वयात वृद्धाश्रमांमध्ये एकटे जीवन व्यतीत करण्यापेक्षा असे पुनर्विवाह ही काळाची गरज बनत चालले आहेत. अशा विवाह सोहळ्यांमुळे बुरसटलेल्या विचारांना तिलांजली मिळेल, असं या निमित्ताने म्हणता येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here