: मुंबईत जागेला सोन्याचे भाव असल्याने म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये अर्थात ट्रान्झिट कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून गरीबांची घरे बळकाविण्यात येत आहेत. आणि काही मूठभर पोलिस अधिकाऱ्यांच्या साथीने म्हाडाचे अधिकारीच घरे बळकावत असल्याची असंख्य उदाहरणे पुढे येत होती. मात्र, तरीही म्हाडाचे अधिकारी आजवर नामानिराळे राहत होते. आता आता या प्रश्नी मुळावरच घाव घालण्यासाठी ज्या कॅम्पमध्ये घुसखोरी होईल तिथल्याच भाडेवसुली अधिकारी तसेच संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून गृहनिर्माण विभाग त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहे.

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, म्हाडाचे तसेच एसआरएचे पुनर्विकासाचे प्रकल्प, कोसळलेल्या इमारतीतील रहिवासी तसेच खासगी विकासकांच्या प्रकल्पातील रहिवासी यांना राहण्याचा पर्याय दिला जातो. मात्र, अनेक ठिकाणी घुसखोरांनी या ट्रान्झिट कॅम्पच्या जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे अनेकदा एखाद्या ट्रान्झिट कॅम्पची जागा पुनर्वसनासाठी दिल्यानंतरही त्याठिकाणी आधीपासूनच घुसखोरांनी जागा बळकावल्याचे अनेक प्रकरणात निदर्शनास आले आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरी अनेकदा म्हाडाचे अधिकारी व दलाल यांच्या संगनमताने घडते. विशेष म्हणजे बहुसंख्य वेळा स्थानिक पोलिसांनाही या कामात सहभागी करून घेतले जाते. १० लाखांपासून ते २५ लाखांपर्यंत अशी खोल्यांची विक्री म्हाडाचे अधिकारी व एजंट खोटी कागदपत्रे तयार करून करत असल्याचेही उघड झाले आहे. काही कामानिमित्त एखादे कुटुंब चार-पाच दिवस बाहेरगावी गेल्यानंतर रातोरात कुलूप तोडून घुसखोरी केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

या घुसखोरीला आळा घालण्यासाठीच आता गृहनिर्माण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘म्हाडाच्या ट्रान्सिट कॅम्पमधील घुसखोरी होणे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. संबंधित ठिकाणचे भाडेवसुली अधिकारी, तेथील म्हाडाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस अधिकारी या प्रकरणात सामील असतात. साहजिकच घुसखोरांमुळे सर्वसामान्य गरीब कुटुंब रस्त्यावर येते. ज्यांच्या हक्काचे घर असते त्यांना ते मिळायलाच हवे. त्यामुळे आता घुसखोरी करणारा कोणीही असो, त्याला घरातून बाहेर काढून तुरुंगात जाईल हे पाहिले जाईलच. मात्र मुळावरच घाव घालताना या सर्व गोष्टींसाठी तिथल्या भाडेवसुली अधिकारी तसेच संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यालाही जबाबदार धरले जाईल.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here