सोलापूर: भाजपचे खासदार यांच्याविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर आज बुधवारी सोलापुरातील न्यायालयात सुनावणी करण्यात आली. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार तहसीलदारांनी ही फिर्याद दिली होती. त्यानुसार सोलापूर कोर्टाने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. १५६/३ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे कोर्टाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कोर्टाने दिलेल्या आदेशावर प्रतिक्रिया देताना खासदार महास्वामींचे वकील संतोष न्हावकर यांनी, उद्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

सोलापुरातील जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते, या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी याचिका महास्वामी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयात येत्या २३ मार्चला सुनावणी होणार आहे तर प्रतिवादी प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर २० मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान, सोमवारी २ मार्च रोजी उच्च न्यायालयाने तहसीलदारांनी फिर्याद दिली नसल्यास काहीच कार्यवाही करू नये आणि फिर्याद दिली असल्यास सोलापूर न्यायालयाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकी कचाट्यात सापडली आहे. महास्वामींच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी १५ फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले १२ अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना महास्वामींनी सादर केलेले बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्याचवेळी महास्वामींची खासदारकी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here