ढाका: बांगलादेशमध्ये हिंदू मंदिर, घरांवर होत असलेल्या हल्ल्याप्रकरणी बांगलादेश सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या हल्ल्यामुळे पंतप्रधान शेख हसीना नाराज असून त्यांनी गृहमंत्र्यांना हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तथ्य जाणून घेतल्याशिवाय सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ठिकठिकाणांहून ४५० जणांना अटक केली आहे. दंगलीप्रकरणी विविध ठिकाणी ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ५० वर्षांपूर्वी बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्या विचारसरणीच्या संघटना आताही हिंसाचार भडकवण्यासाठी चिथावणी देत आहेत. द्वेष असलेली असत्य माहिती पसरवत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी मंगळवारी झालेल्या साप्ताहिक कॅबिनेट बैठकी दरम्यान, गृहमंत्री असदुज्जमान खान यांना कारवाईचे निर्देश दिले. धर्माचा वापर करून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पंतप्रधानांनी दिले असल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्युन’ने दिले आहेत.

हिंदूंविरोधात हिंसाचार; बांगलादेशच्या माध्यमांनी मांडली ‘ही’ भूमिका
मागील आठवड्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. नवरात्रौत्सवात दुर्गा मंडप, मंदिरांवर धर्मांधांनी हल्ले केले. सोशल मीडियावर कथित ईश निंदा केल्याच्या दाव्यावरून कोमिल्लामध्ये पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार झाला. रविवारीदेखील हिंदू समुदायाच्या २० घरांना आग लावण्यात आली. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर विश्वास नको

पंतप्रधान शेख हसीना यांनी सोशल मीडियावर कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडिावर असलेल्या पोस्टबाबतची सत्यता पडताळण्याचेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले. हिंसाचाराच्या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी गृह मंत्रालयाला सतर्क राहण्याची सूचना त्यांनी दिली.

बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले, ‘दुर्गा पूजा मंडपावर हल्ले हा सुनियोजित कट’
४५० जणांवर कारवाई

पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ४५० जणांना अटक केली आहे. आणखी संशयितांना अटक करण्यासाठी मोहीम सुरू आहे. हिंसाचार प्रकरणी एकूण ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंदू समुदायावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पोलिसांसह अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. बांगलादेशमधील विविध संघटना, पक्षांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सत्ताधारी अवामी लीग पार्टीने देशभरात सामाजिक एकोप्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. बांगलादेशमधील धार्मिक एकोपा कायम राखण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here