पश्चिम घाटक्षेत्रातील परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असून, ही घसरण रोखण्यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर पुरेसा दबाव निर्माण करावा, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केले आहे. केरळमध्ये महापूर व दरडी कोसळून किमान ३५ जण मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर गाडगीळ यांनी धोक्याची जाणीव करून दिली.
पश्चिम घाटातील स्थितीचा अभ्यास करण्यासाठी गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ‘वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्स्पर्ट पॅनल‘ने एक विस्तृत अहवाल तयार करून तो २०११मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास सादर केला होता. वनस्पती, मासे, सर्प, पक्षी, उभयचर आणि सस्तन प्राणी आदींच्या देशभरातील एकूण प्रजातींच्या ३० टक्क्यांहून अधिक प्रजाती या पश्चिम घाटक्षेत्रात आढळतात. या क्षेत्राचा ऱ्हास रोखण्यासाठी काय उपाय करण्याची आवश्यकता आहे, याची माहिती गाडगीळ समिती अहवालामध्ये देण्यात आली होती. मात्र, १० वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
‘निसर्गाचा हा ऱ्हास केवळ केरळमध्येच झालेला नाही, तर पश्चिम घाटक्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र व गोव्यातही वरचेवर अशा आपत्ती येत असतात,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. केरळमधील प्लाचीमोडा येथील ग्रामस्थांनी कोका कोला कंपनीविरोधात पाण्याच्या हक्कासाठी कायदेशीर लढा दिला होता. त्या वेळी केरळ उच्च न्यायालयानेही ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल होता, असे सांगत पश्चिम घाटातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तेथील नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, गटसभा, नगरपालिका आदी सर्व मंचांवरून या अहवालाच्या अंमलबजावणीची मागणी करायला हवी, असे ते म्हणाले.
कस्तुरीरंगन अहवालावर टीका
गाडगीळ समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी २०१२मध्ये केंद्र सरकारने कस्तुरीरंगन समिती नेमली होती. पश्चिम घाटातील केवळ ३७ टक्के प्रदेश हा पर्यावरणदृष्ट्या संरक्षित करण्याची गरज आहे, असे या समितीने म्हटले होते. ‘या क्षेत्रातील नागरिकांना निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार नाही, असे कस्तुरीरंगन समितीने नमूद केले होते. त्यांचे हे म्हणणे घटनाविरोधी आहे,’ अशी टीका गाडगीळ यांनी केली.
संघ-भाजपने पाठ फिरवली
संघपरिवाराच्या केरळमधील काही संघटना; तसेच भाजपचे प्रकाश जावडेकर हे २०१४च्या लोकसभा निडवणुकीपूर्वी आमच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचे विस्मरण झाले. त्यांनी माझ्या ई-मेललाही प्रतिसाद दिला नाही, असे गाडगीळ यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times