स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत घरोबा केला. पण राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर विविध मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी निर्माण झाली. प्रत्येकवेळी संघटनेला गृहित धरण्याचे धोरण अवलंबले गेल्याचा आरोप झाला. त्यामुळे तीन वर्षानंतर संघटनेने भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ही संघटना गेली. ज्यांच्या विरोधात अनेक वर्षे लढा दिला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय लोकांना मान्य झाला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शेट्टींचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघटनेचा दोन्ही काँग्रेसला फायदा झाला, पण संघटनेच्या पदरात काहीच पडले नाही.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून संघटनेला गृहित धरण्याचे राजकारण सुरू झाले. जे भाजपने केले, तेच सत्तेवरील सध्याचे तीन पक्ष करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. वीज बिलात सवलत, महामंडळाच्या माध्यमातून सत्तेत सहभाग, पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि ऊसाला एकरकमी एफआरपी या सर्वच विषयात महाविकास आघाडीने स्वाभिमानीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे संघटनेने सत्तेत राहून आघाडीच्या विरोधात रान उठवण्यास सुरूवात केली. ऊस परिषदेत तर पश्चाताप होत असल्याची कबुली देत शेट्टींनी आघाडीला सुट्टी देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची घोषणा केली.
आघाडीसोबत गेल्यापासून चळवळीचं नुकसान होत असल्याची संघटनेतील कार्यकर्त्यांची भावना आहे. पुन्हा भाजपसोबत जाणे म्हणजे नव्या टीकेचे धनी होण्यासारखे आहे. यामुळे स्वाभिमानी आता ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याचीच दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा इरादाच जाहीर केला आहे. त्यांचे प्रमुख लक्ष्य हे लोकसभा आहे. पण राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचे नाव घालून आघाडीने त्यांना वेसन घातलं आहे. हा निर्णय जेवढा लांबेल, तेवढा शेट्टींचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे.
जेव्हा राज्यपाल निर्णय घेणार नाहीत याची खात्री पटेल तेव्हा शेट्टी आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करतील असं सध्याचं चित्र आहे. पण तोपर्यंत ते इशाराच देत राहतील. प्रत्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुका अजून दोन वर्षानंतर होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षापासून समान अंतर ठेवत राज्यात संघटनेची ताकद वाढवण्याच्या पर्यायावर सध्या संघटनेत खल सुरू आहे. सत्तेला लाथ मारण्याची भूमिका संघटनेतील प्रमुख कार्यकर्ते सतत मांडत आहेत. पण सत्तेत राहून कामे करून घेण्याची निती शेट्टी यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांची ही निती उपयोगी पडली, पण राज्यात आणि केंद्रात तसे होत नसल्याने त्यांचीही निर्णय घेताना कोंडी होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times