हायलाइट्स:

  • कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच
  • महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी अटकेत
  • प्रशासकीय वर्तुळात खळबळ

अहमदनगर : कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२ रा. मानकर गल्ली, दिल्लीगेट नगर) यांना अटक करण्यात आली आहे. मानकर वर्ग १ दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी ती मागितल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पथकाने त्यांना आज ताब्यात घेतलं आहे. प्रवीण मानकर यांच्या अटकेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रारदार व त्यांचे मावसभाऊ महापालिकेचे कंत्राटदार आहेत. त्यांनी महापालिकेची विविध कामे केली आहेत. त्या कामांची बिले मंजूर करून त्यांना चेक दिल्याच्या बदल्यात मानकर यांनी लाचेची मागणी केली होती. वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले होते. यासंबंधी तक्रार आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणीसाठी सापळा लावला. ७ ऑक्टोबर रोजी मानकर यांनी पंचासमोर लाचेची मागणी केली होती. त्यामुळे नंतर त्यांनी ती स्वीकारली नसली तरी मागणी केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांच्याविरूद्ध २० ऑक्टोबरला तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sanjay Raut: संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र!; ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आणि…

या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, प्रशांत सपकाळे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, मानकर महापालिकेत मुख्य लेखाधिकारी या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मूळचे नगरचे असून सध्या ते पुण्यात विश्रांतीवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. महापालिकेतील मोठा अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी महापालिकेत नगरचना विभागासह अन्य विभागातील अधिकारीही लाचेच्या सापळ्यात अडकल्याची उदाहरणे आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here