हायलाइट्स:

  • महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
  • महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर घडला प्रकार
  • अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : सांगलीत शारदानगर येथे एका वृद्धाश्रमात राहात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी धूम स्टाईलने पोबारा केला. बुधवारी सकाळी वृद्ध महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची चैन लंपास केली. या प्रकरणी रुक्मिणी नारायण लाड (वय ७०, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. वृद्धासेवाश्रम, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुक्मिणी लाड या मूळच्या बेळगाव येथील आहेत. सुमारे साडेतीन वर्षांपासून कुपवाड रोडवरील शारदानगर येथील वृद्धासेवाश्रम संस्थेत त्या आश्रयास आहेत. लाड या दररोज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान वृद्धासेवाश्रम परीसरात पायी फिरायला जात असतात. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धाश्रम परिसरात पायी फिरत होत्या. तेव्हा वृद्धाश्रम परिसरात असलेल्या पुण्याई बंगल्याजवळून जात असताना समोरुन एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरुण आला. त्याने लाड यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन पोबारा केला.

नगरमध्ये खळबळ: बडा अधिकारी लाच प्रकरणात अडकला; पोलिसांनी केली अटक

या प्रकारानंतर लाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद संजयनगर पोलिसात झाली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, आठवडाभरात सांगलीत चैन स्नॅचिंगची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here