म. टा. वृत्तसेवा,

एका दिवसात चोवीस तास… इतक्या अल्प वेळात तुम्ही काय करू शकणार? नायक चित्रपटातील नायकाने याच अल्प वेळात मुख्यमंत्री होऊन राज्याला शिस्त लावली. भ्रष्टाचार मोडीत काढला. अत्याचार संपविला. चित्रपटच ते! वास्तवात हे शक्य नाही. तरीही त्याच्यासारखे एक दिवस आपणही सक्षम नेते, अधिकारी व्हावे ही इच्छा मनात जागी होते. जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने बालमनातील याच इच्छा पूर्ण केल्या जात आहेत. बुधवारी एक दिवसाची बुलडाणा पोलिस अधीक्षक म्हणून सहरीश कंवल हिला संधी देण्यात आली. या खुर्चीचे महत्व, कामकाज समजून घेण्याची संधी देतानाच महिला सक्षमीकरणाची प्रेरणाही दिली गेली. यापूर्वी ‘एक दिवसाची कलेक्टर’ उपक्रमही राबविण्यात आला होता.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक व सामुदायिक उत्तरदायित्वाची भूमिका रूजविण्यासाठी एक दिवसाची जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी सहरीश कंवल हिच्याकडे सांकेतिक स्वरूपात जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार सोपविला.

सर्वसाधारण कुटुंबातील असलेल्या सहरीशचे वडील अब्दूल आसिफ हे गॅरेज मेकॅनिक तर आई समिना शिरीन गृहिणी आहे. पोलिस अधीक्षकांच्या अंबर दिव्याच्या गाडीत सहरीशचे जिल्हा पोलिस मुख्यालयात ऐटीत आगमन झाले. शिष्टाचारानुसार पोलिस दलाच्या सशस्त्र तुकडीने सहरीशला मानवंदना दिली. त्यानंतर तिने जवानांच्या तुकडीचे निरीक्षण केले. पोलिस अधीक्षकांनी मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. पोलिस विभागाच्या विविध शाखा व उपशाखांची माहिती तसेच आढावा देण्यात आला. डॉ. भुजबळ यांनी बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अत्याचार प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या कळी उमलतांना, महिला तक्रार निवारण पेटी, महिला दक्षता समिती, दामिनी पथक, निर्भया पथक, स्वयंसिद्धा पथक, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन, स्वसंरक्षण, सायबर सेफ वुमेन आदी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच सामुदायिक उत्तरदायित्व या भावनेने बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन हे महिलांना आपल्या माहेरासारखे वाटेल या उदात्त विचारधारेकडे जिल्हा पोलिस प्रशासनाची वाटचाल राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here