हायलाइट्स:
- महिला कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी होणार
- ‘ड्युटी दरम्यान अशा पद्धतीचं काम ‘बेशिस्तपणा’च्या श्रेणीत येतं’
- फोटोमुळे योगीजी इतके व्यथित झाले की महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई : प्रियांका गांधी
बुधवारी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी यांच्या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी दिल्लीहून निघाल्या होत्या. त्यांना आग्रा लखनऊ एक्सप्रेसवेवर अडवण्यात आलं. परवानगीशिवाय पुढे जाता येणार नसल्याचं सांगत त्यांना रोखण्यात आलं. या दरम्यान इथं उपस्थित असणाऱ्या काही महिला पोलीस कर्मचारी आणि उपनिरीक्षकांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फी घेतले.
हे फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ताबडतोब लखनऊ पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांनी पोलीस उपायुक्त ख्याती गर्ग यांना या प्रकरणाचे आदेश दिले. ड्युटी सोडून सेल्फी काढणं हे गंभीर प्रकरण असल्याचं आणि हा बेशिस्तपणा असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. विभागीय चौकशीत या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही आहे.
‘…तर मलाही शिक्षा मिळावी’
‘या फोटोमुळे योगीजी इतके व्यथित झाले की ते या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करू इच्छितात. माझ्यासोबत फोटो घेणं गुन्हा असेल तर मलाही याची शिक्षा मिळावी. या निष्ठावान पोलीस कर्मचाऱ्यांचं भविष्य बिघडवणं सरकारला शोभा देत नाही’, असं प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
लखनऊ पोलिसांच्या या कारवाईवर प्रियांका गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकार महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं भविष्य बिघडवत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केलाय. ‘त्यांनी केवळ फोटो घेतला. मी आनंदानं त्यांच्यासोबत सेल्फी घेतला यात चुकीचं काय आहे. यासाठी त्यांचं भविष्य खराब करून राज्य सरकारला काय मिळणार आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times