हायलाइट्स:
- सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे
- कृषी कायद्यांना विरोध, इंधन दरवाढीचा मुद्दा गाजणार
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत तारखांचा अंतिम निर्णय होणार
मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या २९ नोव्हेंबर रोजी सुरुवात होण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू ठेवण्यावर विचार सुरू आहे. अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यासाठी लवकरच संसदीय प्रकरणाशी निगडीत मंत्रिमंडळाच्या समितीची एक बैठक पार पडणार आहे. यात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
गेल्या वर्षी मोदी सरकारनं हिवाळी अधिवेशन रद्द करताना करोना संक्रमणाचं कारण दिलं होतं. यंदा मात्र नियमित अधिवेशन होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज एकत्रच पार पडू शकेल.
ऑगस्टमध्ये संपुष्टात आलेल्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी प्रकरणासहीत कृषी कायद्यांविरुद्ध विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. सरकारच्या अडील भूमिकेमुळे या विषयांवर संसदेत पुरेशी चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे अधिवेशनाचा बराचसा वेळ वाया गेला.
येत्या वर्षात उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही सरकार आणि विरोधक जोर लावताना दिसू शकतात.
सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे महागाई, पेट्रोल डिझेलचे भरमसाठ वाढलेले दर, भारत – चीन सीमा संघर्ष, कृषी कायदे, कायदे-व्यवस्थेचा बोजवारा यांसहीत अनेक मुद्दे आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times