हायलाइट्स:
- जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा खळबळजनक दावा
- दोन फायली मंजूर करून घेण्यासाठी ३०० कोटींची ऑफर
- ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्याही कानावर घातल्याचा मलिक यांचा दावा
नवी दिल्ली : मेघालय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच एक मोठा दावा करत राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवून दिलीय. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपालपदी कार्यरत असताना आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केलाय. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त विधानांपैंकी हे एक विधान ठरलं.
अंबानी – आरएसएसशी निगडीत व्यक्ती कोण?
दोन फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी ‘अंबानी’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ संबंधित व्यक्तींनी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केलाय. मात्र, ही ऑफर आपण धुडकावून लावल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदींचं कौतुक
याचवेळी सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मात्र कौतुक केलं. ‘भ्रष्टाचाराशी कोणतीही तडजोड करू नका’ असा सल्ला पंतप्रधानांनी दिल्याचं सत्यपाल मलिक यांनी यावेळी म्हटलं.
काय म्हणाले सत्यपाल मलिक?
‘काश्मीरला दाखल झाल्यानंतर माझ्यासमोर दोन फायली आल्या होत्या. एक अंबानींची फाईल होती तर दुसरी आरएसएसशी निगडीत एका व्यक्तीची, ही व्यक्ती आदल्या मेहबुबा मुफ्ती आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्रीही होती. तसंच ही व्यक्ती पंतप्रधानांच्या अगदी जवळची व्यक्ती होती. या फायलींमध्ये घोळ असल्याची सूचना मला दिली. त्यानंतर मी एकानंतर एक अशा दोन्ही डील रद्द केल्या. प्रत्येक फायलींसाठी १५० – १५० कोटी रुपये देण्याची संबंधितांची तयारी असल्याचं सचिवांनी मला सांगितलं. पण, मी पाच कुर्ते – पायजमा घेऊन आलोय आणि त्यासोबतच इथून जाईल, असं त्यांना सांगितलं’ असं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं.
या दोन फायलींसंदर्भात आपण थेट पंतप्रधान मोदींची वेळ घेऊन त्यांना माहिती दिली. तसंच ‘पद सोडावं लागलं तरी चालेल तपण या फायलींना मंजुरी देणार नाही’, असं आपण पंतप्रधानांना सांगितल्याचंही मलिक यांनी म्हटलं. यावर, ‘पंतप्रधानांनीही आपल्याला भ्रष्टाचारासोबत कोणतीही तडजोड करू नका’ असं सांगितल्याचं मलिक म्हणाले.
काश्मीर देशातील सर्वात भ्रष्ट
काश्मीर हे देशात सर्वाधिक भ्रष्ट स्थान असल्याची टीका सत्यपाल मलिक यांनी यावेळी केली. देशात ४ – ५ टक्क्यांचं कमिशन मागितलं जातं, परंतु, काश्मीरमध्ये तब्बल १५ टक्क्यांपर्यंत कमिशनची मागणी केली जाते, असा दावाही मलिक यांनी केलाय.
‘मी गरीब व्यक्ती’
मी काश्मीरमध्ये असेपर्यंत भ्रष्टाचाराचं कोणतंही मोठं प्रकरण समोर आलं नाही. मी गरीब व्यक्ती आहे त्यामुळे देशातील कोणत्याही शक्तीशाली व्यक्तीशी लढू शकतो. निवृत्त झाल्यानंतर राहण्यासाठी घरही नाही, त्यामुळे चिंतेचीही आवश्यकता नाही, असं म्हणत आपल्या स्वच्छ चारित्र्यावर त्यांनी जोर दिला.
‘त्या’ फाईली कोणत्या?
यानंतर, राज्य सरकारनं अनिल अंबानी समूहाची कंपनी ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स’शी एक करार केला होता. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि मान्यताप्राप्त पत्रकारांच्या आरोग्य विम्याच्या योजनेशी संबंधित एक फाईलचा उल्लेख मलिक यांनी आपल्या भाषणात केल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ऑक्टोबर २०१८ मध्ये जम्मू काश्मीरचे तत्कालिन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘रिलायन्स जनरल इन्श्युरन्स’शी हा करार निरस्त करण्याचे आदेश दिले होते. कर्मचाऱ्यांच्या या आरोग्य वीमा योजनेत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times