परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियमचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला असून पुढील बेल्जियम दौऱ्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली. भारत आणि युरोपीय संघाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करोना विषाणूबाबत दिलेल्या माहितीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम दौरा रद्द करण्याच आल्याचे रवीश कुमार म्हणाले.
जगभरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या संदर्भात बोलताना रवीश कुमार म्हणाले की, जगभरातील भारतीय दूतावास इतर देशांमध्ये असलेल्या भारतीयांसाठी काम करत आहेत. या बरोबरच सध्या ईराणमध्ये कोणत्याही भारतीयाला करोना विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीनंतरच्या स्थितीवरही रवीश कुमार यांनी भाष्य केले. आता राजधानी दिल्लीत स्थिती जलदगतीने सामान्य असल्याचे ते म्हणाले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा उत्तम काम करत आहेत, असेही ते म्हणाले. दिल्ली दंगलीवर तुर्कस्तानाचे राष्ट्रपती रजब एर्दोआन यांच्या वक्तव्यावरही रवीश कुमार यांनी भाष्य केले आहे. एर्दोआन यांचे वक्तव्य राजकीय स्वरूपाचे असल्याचे ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times