जालना: एमआयडीसीतील एका कारखान्यात आज सायंकाळी शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटानंतर भडकलेल्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जालन्यातील औद्योगिक वसाहतीत ओम साईराम कारखाना आहे. लोखंडी सळ्यांच्या या कारखान्यात आज सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट प्रचंड मोठा होता. स्फोटानंतर कारखान्यात लगेचच आग लागली आणि संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. यावेळी कारखान्यात काही कामगार काम करत होते. अचानक झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे या कामगारांना कारखान्यातून बाहेर पडणं अशक्य झालं. त्यामुळे या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक कामगार होरपळले आहेत. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं. या स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकायला आल्याचं सूत्रांनी सांगितलं. स्फोट झाल्यानंतर कंपनीत एकच धावपळ उडाली होती. काही कामगारांच्या आरोळ्याही ऐकायला येत होत्या. मृत कामगारांची ओळख पटली नसून कारखान्यात महिलाही काम करत होत्या का? याचाही तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरू केलं आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here