करोनाचा प्रभाव दिवसेदिवस वाढत असून हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अंबाबाई मंदिरात रोज देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने देवस्थान समितीने उपाययोजना सुरू केली आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी महाद्वार, घाटी, पूर्व आणि दक्षिण असे चार दरवाजे आहेत. या दरवाजातून प्रवेश करणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकून त्यांचे हात निर्जंतुक करण्यात येणार आहेत. मंदिरात रोज १५ ते १७ हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना पुरेल इतके सॅनिटायझर उपलब्ध झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत ही उपययोजना सुरू करण्यात येणार आहे. आजारपण विसरून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांनी तोंडाला मास्क, स्कार्फ, रुमाल बांधून यावे, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.
मंदिरात स्वच्छता राखण्यात येत असून दर आठ दिवसात मंदिरात पेस्ट कंट्रोल करण्यात येते. तीन ते चार तासांनी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. चारही प्रवेशद्वारावर करोना आजाराची माहिती आणि प्रतिबंधक उपाययोजनासंबधी डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. मंदिराच्या आवाराताील ध्वनीक्षेपकावर दर एका तासाने करोनासंबधी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याच्या सूचना देऊन जनजागृती केली जात आहे. तसेच माहिती पत्रके छापून वाटण्यात येणार आहेत.
मंदिर प्रशासनाने आज डॉक्टरांची बैठक घेतली. याबैठकीला समितीचे अध्यक्ष महेश जाधव, डॉ. संदीप पाटील, स्वप्नील भोसले, डॉ. सचिन शिंदे उपस्थित होते. मंदिरात करोना संबधित कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा झाली. महानगरपालिका प्रशासनाचीही उपाययोजना करण्यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचं मंदिर समितीने सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times