‘राज्यात ‘करोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. या आजाराबाबत विनाकारण पॅनिक होऊ नये,’ असे आवाहन अजोय मेहता यांनी केले. त्याचवेळी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडे बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनाही मेहता यांनी केल्या.
‘या’ १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
‘करोना’ संदर्भात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी व त्यासंदर्भात करण्यात येत असलेली कार्यवाही; तसेच उपाययोजनांचा आढावा घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता चीनसह १२ देशांतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील एखाद्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल करून त्यांचे नमूने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले जातात. त्यानंतर चाचणी निगेटिव्ह आल्यास त्या प्रवाशाला घरी सोडण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times