हायलाइट्स:
- करोना आणि महापुराने शेतकऱ्यांना आर्थिक दणका
- दूध संघांनी बोनसच्या रूपाने दिला मदतीचा हात
- दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
करोनाच्या संकटामुळे यंदा सर्वसामान्य जनतेबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र, यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघांनी वर्षभर मदतीचा हात दिला. दुधाचा खप कमी झाला तरी उत्पादकांना त्याचा फटका बसू दिला नाही. सर्व दुधाचे संकलन करून दूध भुकटी तयार केली. करोना प्रादुर्भावासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे.
उभ्या पिकात पाणी घुसल्याने पिकं कुजून गेली. हातातोंडाशी आलेली पिकं कुजल्याने शेतकरी वर्गाला त्याचा मोठा फटका बसला. राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई अतिशय कमी असल्याने हा वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दूध संघानी मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ, वारणा, शाहू, यळगूड यासह बहुसंख्य दूध संघांनी उत्पादकांना लिटरमागे दोन रूपयांपेक्षा जास्त बोनस दिला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर सुमारे दहा लाख उत्पादकांच्या खात्यावर दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. यामध्ये गोकुळने आघाडी घेतली असून पाच लाखापेक्षा जास्त दूध उत्पादकांना ८३ कोटी ८० लाख रूपये बोनस दिला. या पाठोपाठ वारणा दूध संघाने ५१ कोटी ३७ लाखाचा बोनस उत्पादकांना दिला आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी यंदाही कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकारी क्षेत्रातील विविध बँकानीदेखील कर्मचाऱ्यांना बोनस व सभासदांना लाभांश दिला आहे. जिल्हा बँकेने कर्मचाऱ्यांना सात कोटी रूपये बोनस तर दहा हजार संस्थांना पंचवीस कोटींचा लाभांश दिला आहे. गोकुळने कर्मचाऱ्यांना १८ कोटी रुपयांचा बोनस दिलाआहे. वारणा दूध संघानेही कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. बहुसंख्य साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला एफआरपी जाहीर केला आहे. दिवाळीनंतर तातडीने शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर करोना आणि महापुरामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी व दूध उत्पादकांना दूध संघ, साखर कारखान्यांनी बोनसच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी लख्ख प्रकाशात उजाळणार आहे.
‘गोकुळ दूध संघाने पंरपंरेप्रमाणे यंदाही दूध उत्पादकांना खर्चात काटकसर करून राज्यातील इतर संघांच्या तुलनेत जास्त दूध दर दिला आहे. करोनामुळे शेती व शेतीपुरक व्यवसाय अडचणीत असताना उत्पादकांना अतिशय गरजेच्या वेळी गोकुळने मदतीचा हात दिला. यासाठी नेत्यांचे चांगले सहकार्य लाभले,’ असं गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times