हायलाइट्स:

  • पंख्याचे पाते तुटून डोक्यात घुसल्याने तरुणाचा मृत्यू
  • कोल्हापूरमधील दुर्दैवी घटना
  • घटनेनंतर खाटांगळे परिसरात हळहळ

कोल्हापूर : भात पिकाला वारे देत असताना पंख्याचे पाते तुटून डोक्यात घुसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना करवीर तालुक्यातील खाटांगळे पैकी सडोलकरवाडी येथे घडली. सौरभ सर्जेराव खाडे (वय २५ रा. खाटांगळेपैकी, सोडलकरवाडी) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.

सध्या ग्रामीण भागात भात कापणी सुरू आहे. भात कापल्यानंतर ते वाळवले जाते आणि त्यानंतर भाताला वारे देऊन कचरा किंवा पिंजार वेगळे केले जाते. नैसर्गिक वाऱ्याच्या झोतावर भाताला वारे दिले जाते पण अनेक ठिकाणी फॅनचा वापर केला जातो. खाडे यांच्या शेतात रोटाव्हेटरला (छोटा ट्रॅक्टर) पट्टा जोडून फॅन लावला होता. सौरभ आणि त्यांचे नातलग भाताला वारे देत होते.

aryan khan case : दिल्लीत दाखल होताच समीर वानखेडे म्हणाले….

भाताला वारे देत असताना सौरभ खाली वाकला आणि त्यावेळी अचानक फॅनचे पाते तुटून वेगाने सौरभच्या कानाच्या मागे घुसले. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.

दरम्यान, फॅनच्या पात्यांचे नट बोल्ट सैल झाल्याने आणि रोटाव्हेटरचा वेग प्रचंड असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ तब्येतीने दणकट होता. तो होमगार्डमध्ये भरती झाला असून गेले सहा महिने तो करवीर पोलीस ठाण्यात बंदोबस्तास होता. तसंच अधून-मधून तो शेतीची कामेही करत होता. या घटनेनंतर खाटांगळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here