हायलाइट्स:
- भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० सामना…
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये उपस्थित असताना हिंदुस्तानचा पराभव साजरा’
- ‘पाकिस्तानच्या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्यांचा डीएनए भारतीय नाही’
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याद्वारे पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधलाय.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये उपस्थित असताना पाकिस्तानी टीमचा टी-२० विजय आणि हिंदुस्तानच्या पराभव अशा पद्धतीनं साजरा केला जावा आणि हिंदुस्तानविरोधी घोषणा दिल्या गेल्या तर निश्चितच हा चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारनं ही गोष्ट गंभीरतेनं घ्यायला हवी’ असं या व्हिडिओसोबत संजय राऊत यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या तीन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर खोऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
‘त्यांचा डीएनए भारतीय नाही’
‘पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर भारतात फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय असू शकत नाही. आपल्या घरात लपून बसणाऱ्या देशद्रोह्यांपासून सावध राहा’ असं ट्विट हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केलंय.
विद्यार्थ्यांविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, श्रीनगरच्या ‘शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगर’च्या तसंच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांवर रविवारी टी २० वर्ल्डकप दरम्यान पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या घोषणा देण्याचा आरोप करण्यता आलाय.
यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आल्यानं संबंधित विद्यार्थ्यांना जामीन मिळणं कठीण झालंय. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी यूएपीए कायद्याचा वापर केला जातो. दहशतवादी, गुन्हेगारांविरोधात वापरला जाणारा हा कायदा काश्मीरमधील विद्यार्थ्यांविरोधात वापरला गेल्यानं स्थानिकांत रोष दिसून येतोय.
काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
रविवारी, पंजाबच्या संगरुरमध्ये ‘भाई गुरु दास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी’ महाविद्यालयाच्या हॉस्टेल इमारतीत काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मारहाण करणारे विद्यार्थी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करताना त्यांनी ‘पाकिस्तानी’ म्हणवून हिणवत होते. काश्मिरी विद्यार्थ्यांनी भारताच्या पराभवाचं सेलिब्रेशन केल्याचा आरोप करण्यात आला. तर ‘आम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत आणि आम्हीही भारतीय आहोत. तुम्हीही पाहू शकता आम्हाला काय वागणूक देण्यात येतेय. आम्ही भारतीय नाहीत का? मोदीजी यावर काय बोलणार?’ असा प्रश्न काश्मिरी विद्यार्थ्यांनी विचारला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times