हायलाइट्स:

  • रोख वीजबिल भरण्यासाठी आता मर्यादा
  • महावितरणने घेतला मोठा निर्णय
  • १ नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

सोलापूर : महावितरणने वीजबिल भरण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व वर्गवारीतील ग्राहकांना १ नोव्हेंबरपासून वीजबिल (वीज बिल) रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे मोबाईल ॲप तसंच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ग्राहकांना वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यासाठी यापुढे पाच हजार रुपयांची मर्यादा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ किंवा धनादेशाद्वारे देखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. तसंच मुदतीनंतर धनादेश क्लीअर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश अनादरित झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक प्रक्रिया शुल्क व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहेत.

Maharashtra Issued Order On Mask मोठा निर्णय: राज्यात सर्व कार्यालयांत मास्कसक्ती; ‘हा’ धोका टाळण्यासाठीच…

वीजबिलांपोटी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ची सोय उपलब्ध आहे. महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसंच महावितरण मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे,’ऑनलाईन’ भरणा करणे तसंच मागील पावत्या व तपशील पाहणे ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांचे बील भरण्यासह इतर सेवा उपलब्ध आहे. तसंच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५००/- रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.

क्रेडीटकार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा हा निशुल्क आहे. वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसंच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा सुमारे १४०० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’द्वारे भरणा करत आहेत, तर लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे.

दरम्यान, वीजग्राहकांनी करोना महामारीच्या काळात रांगेत उभे राहून किंवा इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी ‘ऑनलाईन’द्वारेच वीजबिलांचा भरणा करावा, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here