हिंगोली शहरातील सराफा बाजारात एका दुकानात बुरखाधारी महिलेने काही दिवसापूर्वी अत्यंत शिताफीने चोरी करत पलायन केले होते. तेव्हा ती घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज पुन्हा तिच महिला त्याच सराफा दुकानात जाऊन त्याच पद्धतीने चोरी करण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु, यावेळेस ती महिला फसली. ती चांदीच्या दागिन्यांची चोरी करत असताना सराफा व्यवसायिकांनी रंगेहात पकडलं.
चोरी केल्याचे लक्षात येताच व्यवसायिकांनी तात्काळ दुकानाचे गेट बंद करून संबंधित बुरखाधारी महिलेला दुकानातच बंद केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हिंगोली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास करण्यासाठी संबंधित बुरखाधारी महिला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत पुढील तपास सुरू आहे.
या महिलेने अकोला वाशिम, हिंगोली, परभणी, जिल्ह्यातील पूर्णा, अमरावती यांसह अनेक ठिकाणी सराफा व्यवसायिकांच्या दुकानातील दागिने लंपास केले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सराफा व्यवसायिकांच्या दुकानात चोरी झालेल्या अनेक चोऱ्यांचा तपास आता केला जाणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times