मुंबई: महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ भाषण आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी केली. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसतं भाषण केलं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं. हे केवळ अर्थमंत्र्यांचं भाषण होतं. त्यात कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण नव्हतं. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे. किती तूट राहील किंवा अधिक्य राहील अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. अर्थसंकल्प समतोल नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यात येतात याचा विसर पडला आहे. या विभागांसाठी काहीही देण्यात आलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. अर्थमंत्र्यांनी भाषणात केवळ कोकणचा उल्लेख केला. पण खरं तर कोकणच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. कर्जमाफीची घोषणा करत असताना, मुदत कर्जाच्या संदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळं शेतकऱ्याचा सातबारा कोरा होऊच शकत नाही, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, ५० हजार आणि एक लाख रुपये मदत देण्याचं वचन दिलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक नवा पैसा सरकारनं अर्थसंकल्पातून दिला नाही. महिला, युवक, शेतकरी आदी कुठल्याही घटकाकरिता नव्या योजना नाहीत. मंदीची भीती दाखवून केवळ अपयश लपवण्याचा प्रयत्न या सरकारनं केला आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here