हायलाइट्स:
- उत्तर त्रिपुरातील चमटिल्ली भागातील घटना
- विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन
- मशिद, घरं, दुकानांची तोडफोड
चमटिल्ला भागात ही घटना घडल्याचं समोर येतंय. विश्व हिंदू परिषदेकडून बांगलादेशात होत असलेल्या हिंदुंविरोधी हिंसाचाराविरोधात एका रॅलीचं आयोजन केलं होतं.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भानुपाडा चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील रोवा बाजारात कथितरित्या अल्पसंख्यांक समुदायाच्या तीन घरांची आणि काही दुकानांची तोडफोड केली गेली तर दोन दुकानं आगीच्या हवाली करण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या रॅलीदरम्यान काही असमाजिक तत्त्वांनी चमटिल्ला भागात दगडफेक केली. तसंच एका मशिदीतही तोडफोड करण्यात आली. सुरक्षा दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या घटनेची तीव्र निंदा केलीय. पीडितांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची मागणी माकपाकडून करण्यात आलीय.
दुसरीकडे, भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी मात्र या घटनेबद्दल कानावर हात ठेवले. आपल्याला या घटनेबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच, अशी काही घटना घडली असेल तर पोलिसांद्वारे योग्य ती कारवाई सुरू केली जायला हवी, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times