हायलाइट्स:
- बहादूरगडमध्ये भीषण अपघात
- अनियंत्रित वेगानं आलेल्या ट्रकनं चिरडलं
- अपघातात तीन महिलांचा मृत्यू, तर तीन गंभीर जखमी
सकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास झज्जर रोडवर फ्लायओव्हरच्या खाली ही घटना घडली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या निर्धारीत रोटेशननुसार या महिला आंदोलनानंतर आपल्या घरी निघाल्या होत्या. रस्त्यावर मधोमध लावलेल्या डिव्हायडरवर बसून या महिला घरी परतण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होत्या. याच दरम्यान समोरून अनियंत्रित वेगानं आलेल्या ट्रकनं या महिलांना धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही महिला वयस्कर होत्या. तीन पैंकी दोन महिलांनी जागेवरच प्राण सोडले तर गंभीर जखमी झालेल्या एका महिलेनं रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. छिंदर कौर (६० वर्ष), अमरजीत कौर (५८ वर्ष), आणि गुरमेल कौर (६० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं आहेत. अपघातात जखमी झालेल्या इतर तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.
या महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्याच्या रहिवासी असल्याचं समजतंय. अपघातानंतर ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांकडून या ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या कारणांनी आत्तापर्यंत जवळपास २०० हून अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times