हायलाइट्स:
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
- पाकिस्तानचं समर्थन देशद्रोह ठरणार
- उत्तर प्रदेशात सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार
पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करत फटाके फोडणाऱ्यांविरोधात ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जवळपास सहा जणांवर आधीच गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या आरोपींवर आता ‘देशद्रोहा’चा गुन्हाही दाखल केला जाणार आहे.
देशाविरुद्ध कोणताीही घटना घडली तर त्याबाबत ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिर, पंजाब, उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ही घटना राज्य सरकारनं गंभीरतेनं हाताळण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांनी म्हटलंय.
उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैंकी एक व्यक्ती बदायूचा रहिवासी आहे. २४ ऑक्टोबर रोजी या व्यक्तीनं फेसबुकवर पाकिस्तानच्या झेंड्यासहीत पाक समर्थनार्थ पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला होता. दुसऱ्या एका प्रकरणात बरेलीच्या दोन जणांवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉटसअप स्टेटस ठेवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखीन एका घटनेत सीतापूरमध्येही एका व्यक्तीला पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉटसअप स्टेटस ठेवल्यानं अटक करण्यात आलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times