हायलाइट्स:
- सलग दुसऱ्या दिवशी लाच घेताना सरकारी कर्मचाऱ्याला अटक
- बांधकाम खात्यातील एका लिपिकास लाच घेताना रंगेहात पकडलं
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
विविध सरकारी खात्यात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सध्या दक्षता जनजागृती सप्ताह सुरू आहे. त्याच सप्ताहाचा एक भाग म्हणून विविध सरकारी कार्यालयात ‘मी लाच घेणार नाही’ अशी शपथ घेतली जात आहे. ही शपथ घेऊन १२ तास उलटताच शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एका पोलिसास १५ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. दिवसा लाचलुचपत विभागाचा छापा पडेल, म्हणून तो रात्री बारा वाजता लाच घेत होता. पण, रात्रीच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
गुरुवारी दुपारी आणखी एकास लाच घेताना पडकण्यात आले. वडिलांची पेन्शन आईच्या नावे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच खाडे याने मागितली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातील हा कर्मचारी आहे. दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचाराबाबत जनप्रबोधन करणाऱ्या अँटी करप्शन विभागाने या सप्ताहात आणखी एका लाचखोरावर कारवाईचा बडगा उगारला आहे. वडिलांची पेन्शन आईच्या नावे करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना, सार्वजनिक बांधकाम विभागातील राजेश खाडे या कनिष्ठ लिपिकाला अँटी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.
या प्रकरणातील तक्रारदाराचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागातील गडहिंग्लज उपविभागात कार्यरत होते. तिथेच ते सेवानिवृत्त झाले होते. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या नावाची पेन्शन आईच्या नावे करण्यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रयत्न सुरू केले. दरम्यान कनिष्ठ लिपिक राजेश खाडे यांन या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारी या कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक राजेश खाडे याला रंगेहात पकडण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times