हायलाइट्स:
- ‘केंद्र सरकारचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलेलं नाही’
- ‘ कदाचित एनसीबी वानखेडे यांची बदली करू शकते’
- रोहित पवारांनी साधला निशाणा
जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रोहित पवार यांना प्रसारमाध्यमांनी एनसीबीची कारवाई, त्यावरून होत असलेले आरोप-प्रत्यारोप याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या बहुतांश आरोपात पुरावे पुढे येत असल्याने ते खरे होत असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात वानखेडे यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई झालेली दिसेल’, असंही ते म्हणाले.
‘समीर वानखेडेंची होऊ शकते बदली’
‘केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी राज्यात येऊन कारवाईचा धाक दाखवत खंडणी मागत असतील तर ते चुकीचं आहे. यासंबंधी जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातील सत्य लवकरच समोर येईल. पुढील एक महिन्यात काय होतंय, ते पाहू. आता एनसीबीनेही वानखेडे यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ते दोषी आढळून आले तर कारवाई होईलच. कदाचित एनसीबी त्यांची बदली करू शकते. तसं झालं तर असे समजता येईल की वानखेडे यांनी मुंबईत काय केलं आहे, हे केंद्र सरकारलाही कळालं आहे. एनसीबीने ज्या कारवाया केल्या, त्या बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी केल्या असं म्हणता येणार नाही. यामध्ये खंडणी आणि पैसा हाच मुख्य विषय आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचा विषय कदाचित नाही,’ अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
दरम्यान, ‘केंद्र सरकारने एनसीबीला ताकद दिली. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी खंडणी मागण्यापर्यंत धाडस करू शकले. त्यामुळे केंद्र सरकारचे त्यांच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही, असं दिसून येते. त्यांचे अधिकारी लोकांकडे खंडणी मागण्यात जास्त व्यस्त आहेत. स्वत:ची मालमत्ता वाढवत आहेत. अधिकारांचा आणि एजन्सीचा वापर राजकीय हेतूने किंवा स्वत: च्या फायद्यासाठी केंद्रीय एजन्सी करत असल्याचं यातून दिसून येते,’ असंही रोहित पवार म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times