अहमदनगर : अहमदनगरमधील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

लालपरी अखेर धावली! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, शासनाकडून मागण्या मान्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग पुन्हा वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग पुन्हा वाढणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये शेवगावमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी. केवळ पन्नास टक्के वाहतूक सध्या सुरु असल्याची माहिती आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही आगारातील संप अजूनही सुरू असून 1 हजार 91 बस फेऱ्या बंद आहेत. यामुळे महामंडळाला 30 लाख 50 हजार रुपयांचा फटका बसला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य

आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत.  त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे सरकारने मान्य केलं आहे.  परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतच कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला. त्यानंतर  एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारच्या निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे. कृती समितिनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यावरही सकारात्मक चर्चा झाली. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासनही देण्यात आलं आहे.

काय आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • महागाई भत्ता देण्यात यावा
  • वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी
  • घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे
  • दिवाळीपूर्वी वेतन मिळावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here