हायलाइट्स:
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर
- टेनिस खेळाडू लिएन्डर पेस यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
- लिएन्डर पेस माझ्यासाठी छोट्या भावाप्रमाणे : ममता बॅनर्जी
‘लिएन्डर पेस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगताना आनंद होत आहे’, असं म्हणत यावेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांचं पक्षात स्वागत केलं.
‘लिएन्डर पेस माझ्यासाठी छोट्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना तेव्हापासून ओळखते जेव्हा मी युवा मंत्री होते. २०१४ पासून वाट पाहतोय त्या लोकशाहीची सकाळ पाहण्याचं देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करू’, असं म्हणत पेस यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आपुलकी व्यक्त केली.
मी १४ वर्षांचा असताना ममता क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी मला माझ्या स्वप्नाजवळ पोहचण्यासाठी सक्षम केलं. आता मी खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ममतांच्या मार्गदर्शनाखाली आलोय. त्यामुळे मी जिथेही काम करेल तिथल्या लोकांसाठी काहीतरी करू शकेल. ममता यांचा माझ्या करिअरवर मोटा प्रभाव राहिलाय, असं म्हणत यावेळी लिएन्डर पेस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लिएन्डर पेस यांनी १९९६ मध्ये अॅटलान्ट ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकल स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. तर तब्बल सात वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.
नफीसा अलीही तृणमूलमध्ये दाखल
सध्या, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. लिएन्डर पेस यांच्यापूर्वी अभिनेत्री आणि माजी काँग्रेस नेत्या नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनीही आज औपचारिकरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नफीसा अली यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी सपाच्या तिकीटावर लखनऊ मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली होती.
गोव्यात भाजप सरकारला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसनं सुरू केलाय. अशावेळी, पक्षात नवनवीन चेहरे सामील करण्याचा प्रयत्न तृणमूलकडून होतोय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times