काबूल : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. या विश्वचषकातील त्यांचा सामना सोमवारी (२५ ऑक्टोबर) स्कॉटलंडशी झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत वाजले, तेव्हा या देशाच्या खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रू आले. तालिबान सरकार अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध कठोरपणे वर्तन करत असल्याचे चित्र दिसत आहे, कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी राशिद खानला अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि टी-२० विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारले असता, त्याने अतिशय सावधपणे प्रश्नांची उत्तरे दिली.

राशिद हा पहिला खेळाडू आहे, ज्याने तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर आपला राग व्यक्त केला होता, पण सुपर-१२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो सावधपणे भाषा वापरताना दिसला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघातील काही खेळाडूंना राष्ट्रगीतावेळी आपले अश्रू आवरता आले नाही. त्यानंतर त्यांनी देशाचा ध्वजही फडकावला. या घटनेनंतर तालिबान सरकारने खेळाडूंशी संपर्क साधल्याची माहिती न्यूज ९ ने दिली आहे. तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज बदलला असून देशात राष्ट्रगीतावरही बंदी घालण्यात आली आहे.

खेळाडूंना मिळाला हा संदेश
संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषकादरम्यान मैदानावर ध्वज फडकवताना किंवा राष्ट्रगीत वाजवताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, असे स्पष्ट संदेश अफगाणिस्तानच्या खेळाडूंना देण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी खेळाडूंनी एक बैठक बोलावून तालिबान सरकारच्या सूचना पाळाण्याच्या आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

राशिद म्हणाला…
राशिदला विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, “आता गोष्टी चांगल्या होत आहेत. आता घरीही सर्व काही सामान्य होत आहे. आम्ही आशा करू शकतो की, भविष्यात सर्वकाही चांगले होईल. आम्ही येथे क्रिकेट खेळण्यासाठी एक संघ म्हणून आलो आहोत आणि चांगली कामगिरी करू इच्छितो. ही अशी गोष्ट आहे, जी खेळाडू म्हणून आमच्या हातात आहे. आम्ही अशा प्रकारे खेळू की, क्रिकेट चाहते आनंद घेऊ शकतील आणि उत्सव साजरा करू शकतील. एक संघ म्हणून आमची ही योजना आहे आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल.”

जेव्हा राशिदला जागतिक क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या अनिश्चित भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, सध्या आमच्या मनात काहीही नाही. सध्या आमच्या मनात एकच गोष्ट आहे की, आम्ही येथे विश्वचषक खेळण्यासाठी आलो आहोत. आम्हाला पाच सामने खेळायचे आहेत, त्यापैकी तीन जिंकायचे आहेत. जे आपल्या हातात नाही, आपल्या नियंत्रणात नाही, याचा विचार आपण करू नये. भविष्यात काय होणार आहे, याचा विचार आम्ही करत नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. जर आम्ही चांगली कामगिरी केली नाही, तर चाहतेही निराश होतील.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here