हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर
- ‘पियाजा गांधी’ला भेट
- इटलीत वसलेल्या भारतीय समुदायाशी संवाद
आपल्या इटली दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोमच्या ‘पियाझा गांधी‘ला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली तसंच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या दरम्यान ‘पियाजा गांधी’मध्ये जमलेल्या भारतीय समाजातील लोकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी – मोदी’ अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत रोम आणि ग्लासगोमध्ये असतील. परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जी २० देशांच्या समुहाच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी रोममध्ये राहतील. त्यानंतर २६ व्या ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (COP-26) मध्ये आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या शिखर बैठकीतही ते सहभागी होण्यासाठी ते ब्रिटनच्या ग्लासगोला रवाना होतील.
G20 शिखर परिषद
शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक आरोग्य’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आलीय. तर दुसऱ्या दिवशी ‘प्रिन्स ऑफ वेल्स’कडून हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात खाजगी अर्थव्यवस्थेच्या भूमिकेवर भाष्य केलं जाईल. यासोबतच दुसऱ्या दिवशी जागतिक नेते हवामान बदल आणि पर्यावरण, शाश्वत विकासासह इतर मुद्द्यांवरही चर्चा करतील.
पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, इटली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि रोममधील भारताचे राजदूत यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं. इटालियन समकक्ष मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांचा रोम आणि व्हॅटिकन सिटी दौरा ३१ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आलाय.
जी २० शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी इतर मित्र देशांच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतील. तसंच त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतील. व्हॅटिकनमध्ये मोदी पोप फ्रान्सिस तसंच परराष्ट्र मंत्री कार्डिनल पिट्रो पॅरोलिन यांची भेट घेतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times