पुणे: जीममध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीची ओळख झाल्यानंतर तिच्या कॉलेजमध्ये जाऊन जीम ट्रेनरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माझ्याशी न बोलल्यास आत्महत्या करण्याची धमकीही या जीम ट्रेनरने कॉलेजमध्ये सर्वांसमक्ष दिली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून जीम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.

कृष्णा प्रकाश कदम (वय २२, रा. सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कदम हा बिबवेवाडी येथील एका जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. त्या ठिकाणी पीडित तरुणी जीमसाठी जात होती. त्यामुळे कदम याची तरुणीसोबत ओळख झाली. ओळख झाल्यानंतर तो तिच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू लागला. एके दिवशी त्याने तरुणीला गाठून तुझ्याशिवाय जगू शकत नसल्याचे म्हणत तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. तरीही तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही जीम ट्रेनरने या विद्यार्थिनीचा पाठलाग सोडला नाही.

आरोपी हा तरुणी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये पोहचला. तरुणीची परिक्षा सुरू असतानाच आरोपीने वर्गात जाऊन तिच्या हाताला पकडून ओढतच तिला बाहेर आणले. माझ्याशी का बोलत नाही, अशी विचारणा करत न बोलल्यास जीवाचे काही तरी बरेवाईट करेन. तुझे नाव घेईन, अशी धमकी त्याने दिली. तसेच, कॉलेज परिसरात तिच्या मनास लज्जा होईल, असे जोराने ओरडला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग व धमकाविल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here