हायलाइट्स:
- ‘लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ’
- सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाजपवर साधला निशाणा
- सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री चार जिल्ह्यांच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री गहलोत शनिवारी बीकानेर, सीकर, चुरू आणि जयपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ‘प्रशासनाची शहर/गावांसोबत मोहीम’ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरांना त्यांनी भेट दिली. यावेळी, जनतेसमोर काँग्रेस सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच आपल्या सरकारला गेल्या वर्षी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधलाय. शाहपुराच्या करीरी गावात झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते.
अमित शहांवर थेट निशाणा
त्यावेळी, गहलोत सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष आणि बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. या आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले. ‘अमित शहा यांचे सगळे प्रयत्न इथे फोल ठरले’, असं म्हणत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.
‘लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ‘
‘आमचं सरकार वाचलंय ते या लोकांमुळेच… भाजपनं दिल्लीच्या दरबारात बसून याचा कट रचला हे आम्ही कसं विसरू शकतो. काय काय डावपेच खेळण्यात आले नाहीत… हे सगळे आमदार तब्बल ३४ दिवस माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिले. १०० पैंकी १९ निघून गेले… पण हा लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ आहे. मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून खेळ चालला. जादुई आकड्याच्या खेळात २०० आमदारांपैंकी १०१, १०० असा आकड्यानं खेळ चालत नाही’, असं म्हणत आपल्या मनातील खदखद गहलोत यांनी व्यक्त केली.
सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली १८ आमदारांची बंडखोरी
गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली १८ आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गहलोत सरकारवर संकट कोसळलं होतं. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times