हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य चर्चेत
  • काँग्रेसने केली जोरदार टीका
  • माफी मागण्याचीही केली मागणी

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत असून याच वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून आलं आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (काँग्रेस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका)

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेलं वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चूल आणि मुल ही शिकवण राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली आहे.

Non Bailable Arrest Warrant : परमबीर सिंग हाजिर हो! कोर्टाने काढले अजामीनपात्र अटक वॉरंट

‘बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रकार’

अतुल लोंढे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. ‘पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मतंच त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली,’ असं लोढे यांनी म्हटलं आहे. ‘महिलांबद्दल संघाची मतं सर्वश्रुत आहेत. मनुस्मृतीला मानणारे हे लोक महिलांची प्रगती पाहू शकत नाहीत हेच राज्यपाल महोदयांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मुली शिकून अशाच प्रगती करत राहिल्या तर २० ते ३० वर्षानंतर देशात आयएएसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दिसतील त्यासाठी बॅलन्स साधण्याचे प्रयत्न करा, असे म्हणणे हा बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रकार आहे,’ असंही ते म्हणाले.

‘मुलींनी प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या हिंमतीने त्या कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करुन दाखवलं आहे. देशाचे पंतप्रधानपद, राष्ट्रपतीपद, राज्यपालपद, न्यायाधीशांच्या पदावरही महिलांनी काम करुन त्या पुरुषांपेक्षा कशातही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. महिला जर प्रगती करत असतील तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय? राज्यपाल पद हे संवैधानिक असून या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. परंतु भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला त्या महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुलींच्या शिक्षणाबदद्ल असे बोलणे हे खेदजनक तसंच संतापजनक आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिळवली आहे,’ असा हल्लाबोलही लोंढे यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here